दिशा लाईव्ह न्यूज --::--(पहूर प्रतिनिधी) --- जामनेर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या आज मंगळवारी झालेल्या ( ता . १९ ) ग्रामसभेत 'दांगडो ' सदृश्य परिस्थिती निर्माण झाली .
ग्रामसभा ही गावाच्या विकासात पुढाकार घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते . ग्रामपंचायत सभागृहात माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले . यावेळी सरपंच आशाताई जाधव , उपसरपंच राजू जाधव यांच्यासह ग्रामविकास अधिकारी शिवदास गव्हाळे उपस्थित होते .
वारकरी संप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या गावात गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळात असल्याची गंभीर समस्या पुंडलिक सोनवणे यांनी मांडली तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन आप्पा लहासे यांनी विजेचा वारंवार होणारा लपंडाव नागरिकांना त्रस्त करत असल्याबद्दल लक्ष वेधले .
सरफुद्दीन शेख यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी असणारी घरकुले आणि विविध योजनांची माहिती मागितली , तर डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर भामेरे यांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर झेब्रा क्रॉसिंग सिग्नल यंत्रणा आणि सूचना फलक लावण्याची जोरदार मागणी केली .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी जलजीवन मिशनच्या रेंगाळलेल्या योजनेची अंमलबजावणी कधी होणार ? असा खडा सवाल केला .
खरंतर ग्रामस्थ विविध समस्यांनी ग्रासलेले असताना ग्रामपंचायत आणि अंगणवाडी विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागाचे प्रशासकीय अधिकारी या सभेला उपस्थित नव्हते .
याविषयी अधिक माहिती घेतली असता ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले नसल्याचे उघड झाले आहे .
खरंतर ग्रामपंचायतीने ग्रामस्थरावर कार्यरत असणारे तलाठी , जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक , पोलीस प्रशासन , वीज वितरण कंपनीचे अभियंता , पशु वैद्यकीय अधिकारी , ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी आदी विविध विभागांच्या प्रशासकीय प्रमुखांना किमान आठ दिवसांपूर्वी लेखी पत्र देऊन ग्रामसभे विषयीची माहिती देणे गरजेचे आहे . मात्र असे कोणतेही पत्र ग्रामपंचायतीकडून दिले गेले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे .
ग्रामपंचायत करते तरी काय ?
अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा , स्वच्छतेचा अभाव
रस्त्यांची दुरावस्था अशा विविध समस्या असताना ग्रामपंचायत करते तरी काय ? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे .
मान्यवरांच्या प्रतिक्रिया.
आम्हाला ग्रामसभेत संदर्भात कोणतेही पत्र ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेली नाही .
प्रमोद कोठारे ,
सहाय्यक पोलीस निरीक्षक
पहूर पोलीस ठाणे
ग्रामसभेच्या विषयी आमच्या शाळेत कोणताही अजेंडा आलेला नव्हता .
चंद्रकांत साळुंखे
मुख्याध्यापक
जि . प .प्राथमिक विद्यामंदिर लेले नगर .
ग्रामसभेच्या आयोजनाबाबत दवंडी फिरविण्यात आली होती , मात्र ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर सदर सूचना लावली नसल्याचे आढळून आल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .



Post a Comment
0 Comments