Type Here to Get Search Results !

गावकऱ्यांच्या लोकसहभागातून शेरी शाळेत भव्य वृक्षारोपण!! _पर्यावरण संवर्धनाचा संकल्प – ३५ पेक्षा अधिक विविध जातींची लागवड_



 सौ.गिता भामेरे, पहूर  प्रतिनिधी--::--ता जामनेर

 दिशा लाईव्ह न्यूज -:- जामनेर तालुक्यातील  आदर्श असणाऱ्या शाळांपैकीव  शेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. 

शाळेच्या परिसराला हिरवाईचे वलय प्राप्त करून देण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने व उत्साहाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 या उपक्रमात वड, पिंपळ, निंब, अर्जुन, पाम, अशोक, गुलमोहर, चिंच, कदम, पारिजातक अशा विविध जातींची तब्बल ३५ पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व झाडे ८ ते १० फुटांपेक्षा जास्त उंचीची असल्यामुळे शाळेच्या वातावरणाला त्वरित हरितरूप मिळणार आहे. केवळ झाडे लावून थांबुन न राहता त्यांच्या संगोपनासाठी संरक्षक जाळी बसविण्यात आली असून, झाडांना सतत पाणी मिळावे यासाठी ठिबक सिंचनाची सोय उभारण्यात आली आहे.


                          लोकसहभागातून कृती

या सर्व सुविधांसाठी गावकऱ्यांकडून जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपयांची लोकवर्गणी जमा झाली. एका छोट्या गावासाठी एवढा मोठा निधी उभारणे आणि तोही सर्वांसाठी समान हिताचा उपक्रम उभारण्यासाठी वापरणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब ठरली. गावातील जेष्ठ नागरिक, पालक, तरुण मंडळी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या सक्रीय सहभागामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.


कार्यक्रमावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन शाळेला हिरवेगार करण्याचा संकल्प केला. “झाडे म्हणजे भविष्यातील श्वास. आपण लावलेली रोपे ही आपल्या मुलांसाठी दिलेली जीवनदायी भेट आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गणेश राऊत, शिक्षक गोपाल पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद बनकर,  युवाप्रशिक्षणार्थी मंगला पाटील यांनी सर्व गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


                       गावाच्या एकतेचा प्रत्येय

हा उपक्रम गावकऱ्यांच्या एकतेचे प्रतीक ठरला असून भविष्यात शाळेच्या प्रांगणात निर्माण होणारी हिरवळ ही मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास गावाकऱ्यांनी व्यक्त केला. गावातील एकतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा वृक्षारोपण सोहळा शेरी गावाच्या विकासाच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या उपक्रमासाठी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद बनकर, सरपंच कृष्णा पांढरे, तसेच सर्व ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी संघांचे अनमोल सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments