दिशा लाईव्ह न्यूज--::--प्रतिनिधी पहूर, ता. जामनेर :
जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३ एफ) वरील पहूर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मध्यरेषेपासून १५ मीटर अंतरावरील बांधकामे हटविण्यात आली.
अतिक्रमण हटविणे ही प्रशासनाची जबाबदारी असली, तरी या कारवाईमुळे अनेकांचे रोजगारच हरपले आहेत. “अतिक्रमण हटवले ठीक आहे, पण आमचा उदरनिर्वाह गेला त्याचे काय?” — असा खडा सवाल बेरोजगार झालेल्या अतिक्रमणधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
सणासुदीच्या दिवसात ही मोहीम राबवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नेमके काय साध्य केले, असा सवालही ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. “दिवाळीसारख्या उत्सवी काळातच ही कारवाई करण्याची घाई का झाली? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इतक्या वेगाने काम करत असेल तर मग इतर ठिकाणची वर्षांपासून प्रलंबित कामे का पूर्ण होत नाहीत?” अशीही जनतेची प्रतिक्रिया आहे.
वाघूर पुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे, तर पादचारी पूल कचराकुंडी बनला आहे. गावाजवळ चक्क ताशी ६५ किलोमीटर वेगाचे फलक लावलेले असताना सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे जनतेच्या हितासाठी काम करते की लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुले बनले आहे?” — असा रोखठोक सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अतिक्रमण हटविल्यानंतर रोजगार हरवलेल्या कुटुंबांना पुनर्वसन व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. “या हातांना पुन्हा रोजगार देण्यासाठी शासन वा प्रशासनाकडे कोणते ठोस उपाय आहेत का?” अशी अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा बेरोजगारांच्या असंतोषाचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये उमटतील, असे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसत आहे.


Post a Comment
0 Comments