सौ.गीता भामेरे,पहूर (ता. जामनेर)
दिशा लाईव्ह न्यूज --::-- जळगाव जिल्हा केळी उत्पादनात देशभरात अग्रेसर असला तरी आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, केळी उत्पादकांच्याच मानगुटीवर केळी बसल्याचे चित्र दिसत आहे. कवडीमोल भावामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ आली असून, शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस आणि धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पहूर परिसरातील केळी उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऐन दिवाळीच्या काळात केळीला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, “आली आली दिवाळी, मातीमोल झाली केळी” अशी परिस्थिती उद्भवली आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपली व्यथा मांडताना सांगितले की, “व्यापारी आणि दलाल कवडीमोल दरात केळी खरेदी करत आहेत. झालेला उत्पादन खर्चही निघत नाही. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आता दिवाळीतही दिलासा नाही,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मते, व्यापारी आणि दलाल यांच्या अभद्र युतीमुळे शेतकरी वर्ग भरडला जात आहे. उत्पादन खर्च, वाहतूक आणि मजुरीचे गणित कोलमडून गेले आहे. सोलापूर जिल्ह्यात केळीला २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना, पहूर परिसरात केवळ १००० रुपये भाव मिळत आहे. काही व्यापारी तर ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत असून, हे शेतकऱ्यांच्या आर्थिक घसरणीचे प्रमुख कारण ठरत आहे.
संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, उत्पादनासाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने नुकतेच या क्षेत्रात आलेले नवीन शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे दिसते. शासनाने व्यापारी व दलाल यांच्या मनमानीवर तातडीने अंकुश ठेवावा, अशी जोरदार मागणी शेतकरी बांधवांमधून होत आहे.


Post a Comment
0 Comments