Type Here to Get Search Results !

कापसाच्या वाती आणि कष्टाची माती...! लोहारा, कळमसरा, शेंदूर्णी , पहूर परिसरातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था.




  दिशा लाईव्ह न्यूज --::- सौ. गीता भामेरे ,पहूर (ता. जामनेर) –

अवकाळी पावसाने जामनेर व पाचोरा  तालुक्यात व परिसरातील शेतकऱ्यांचे हाल आणखी वाढवले आहेत. शेतशिवारातील कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, “कापसाच्या झाल्या वाती आणि कष्टाची होतेय माती” अशी शोकांतिका उभी राहिली आहे.


गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची सतत हजेरी लागत आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात असून उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे, परंतु उत्पन्न मात्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. पावसामुळे कापसाच्या गुणवत्तेलाही मोठा फटका बसला आहे. परिणामी आधीच कर्जबाजारी असलेले शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आले आहेत.


यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय संघर्षमय ठरत आहे. एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.




सरकारकडून मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पहूर, शेरी, लोंढरी परिसरात शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडातून कापूस बाहेर पडत आहे — जणू त्याच्या वाती तयार होत आहेत. काही ठिकाणी तर कापसाच्या बोंडावरच सरकी अंकुरताना दिसत आहे.


या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि हतबलता स्पष्ट दिसत आहे. कष्टाने पेरलेले पीक आणि घामाच्या धारांनी जोपासलेले श्रम आता पावसाच्या पाण्यात वाहून जात आहेत.

Post a Comment

0 Comments