पहूर, प्रतिनिधी--::--ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज--::--- क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयाच्या कंपाऊंड भिंतीवर खडीने भरलेले डंपर उलटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, पहूरमध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी बालाजी कन्स्ट्रक्शनचे खडी वाहतूक करणारे एक डंपर जात असताना रस्त्यालगत असलेला तकलादू पाईप अचानक तुटला. पाईपचा आधार कोसळल्याने डंपरचा तोल जाऊन ते सरळ मंगल कार्यालयाच्या भिंतीवर जाऊन धडकले. या धडकेत भिंतीची मोठी हानी झाली आहे.
रविवारी आठवडे बाजार असल्याने लेलेनगर, महात्मा फुलेनगर, शिवनगर परिसरातील नागरिकांची मोठी रहदारी याच मार्गावरून होती. अपघात घडला त्याच वेळी रस्त्यावर पादचारी आणि वाहने मोठ्या प्रमाणात होती. मात्र सुदैवाने कोणत्याही व्यक्तीचा जीवितअपघातात बळी गेलेला नाही.
सदर रस्ता उताऱ्यावर नाही? गंभीर प्रश्न उपस्थित
घटनेनंतर काही नागरिकांनी या रस्त्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की –
सदर रस्ता उताऱ्यावरच नाही
तरीही या रस्त्याकरिता लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला
मंजूर निधी प्रत्यक्षात खर्च झाला का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
रस्ता मंजूर असूनही त्याचे काम न झाल्याने पाईप खचला आणि हा गंभीर अपघात घडला. त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी टाळली का, निधीचा गैरवापर झाला का याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणात चौकशी झाली तर दोषींवर काय कारवाई होते आणि कामांतील अनियमिततेवर लगाम बसतो का, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.


Post a Comment
0 Comments