दिशा लाईव्ह न्यूज --::--- जामनेर तालुक्यातील पहूर येथे स्वर्गीय बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी भव्य बालकाव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ज्ञानवेद प्रबोधिनी’तर्फे हे संमेलन पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण होऊन काव्यलेखनाचे गुण विकसित व्हावेत, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थापक अध्यक्षा सौ. गीता भामेरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होणार असून परिसरातील बालकवींनी आपल्या स्वरचित कविता सादर करण्याचे आवाहन प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा सौ. कल्पना बनकर व सचिव सौ. प्रतिभा राऊत यांनी केले आहे.
सर्व सहभागी बालकवींना मान्यवरांच्या हस्ते ‘ज्ञानवेद प्रबोधिनी’तर्फे सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सहभाग नोंदणी
स्वरचित कवितेची एक हस्तलिखित प्रत संमेलनस्थळी जमा करावी. तसेच खालील क्रमांकांवर पूर्वनोंदणी आवश्यक आहे –
९८ ९० ३१ ५० १२
८८ ३० ४८ ९१ ८२
९८ ६० ५५ ४४ १७
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विश्वस्त रूपाली माळी, रवींद्र लाठे, ईश्वर हिवाळे, स्वप्निल जैन, निलेश सोनार, मनोज चौधरी हरिभाऊ राऊत , प्रकाश जोशी , शंकर भामेरे आदी प्रयत्नशील आहेत.
संमेलनाचे दुसरे वर्ष
गेल्या वर्षी पहूरसह सावित्रीबाई फुले साहित्य नगरीत प्रथमच बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या संमेलनात बालकवींनी उत्साहात आपल्या स्वरचित कविता सादर केल्या होत्या.
अशी आहे उपक्रमामागची प्रेरणा...
जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित ७व्या बालकुमार साहित्य संमेलन निवड फेरीसाठी जाणाऱ्या पहूर येथील उदयोन्मुख बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे हिचा ‘बाल शिवबा’ कविता सादर करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. पहूर बसस्थानकाजवळ वाघूर पुलावर आयशर वाहनाच्या धडकेत तिचा हा अतिशय दु:खद अंत झाला होता.
तिच्या स्मृतीचे जतन व्हावे आणि परिसरातील नवोदित कवींच्या प्रतिभेला एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने ‘ज्ञानवेद प्रबोधिनी’तर्फे हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते.
.jpg)
Post a Comment
0 Comments