Type Here to Get Search Results !

हरियाणामध्ये कबड्डी स्पर्धेत कांस्य पदकावर मोहर उमटविणाऱ्या हर्षदाची पाळधी गावात जंगी मिरवणूक


पहूर प्रतिनिधी---(ता. जामनेर), दि. ३

 दिशा लाईव्ह न्यूज --::--- हरियाणात पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कांस्य पदकाची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या पाळधी,ता.जामनेर या गावची लेक हर्षदा सुहास माळी हिचे गावात दणदणीत स्वागत; भव्य मिरवणुकीने गावात जल्लोष करण्यात आला .


हरियाणा राज्यात नुकत्याच पार पडलेल्या १६ वर्षांखालील नॅशनल कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी संघाने उत्तम खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत कांस्य पदक पटकावले. या यशामध्ये जळगाव जिल्हा, जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील जय श्री राम कबड्डी संघाची खेळाडू कु. हर्षदा सुहास माळी हिचा मोलाचा वाटा आहे.


हर्षदाने संपूर्ण स्पर्धेत उत्तम चढाई, पकड आणि चपळाईचे प्रदर्शन करीत महाराष्ट्र संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोचवले. तिच्या कामगिरीने गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद पद्धतीने झळकले.


गेल्या १६ वर्षांपासून जळगाव जिल्ह्याला या राष्ट्रीय स्पर्धेत कोणतेही पदक मिळाले नव्हते. हा दुष्काळ अखेर हर्षदा माळीने संपवला. पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवून तिने जिल्ह्याचा अभिमान वाढवण्यासोबतच येथील ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, हे दाखवून दिले.


गावात उत्साह, ढोल-ताशांचा गजर, फुलांनी सजलेले स्वागत

हर्षदा घरी परतल्यानंतर पाळधी गावात उत्साह उसळला. गावातील प्रवेशद्वारावर तिचे फुलांच्या हारांनी, गुलाल उधळून आणि घोषणाबाजीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, नातेवाईक, महिला व युवक मोठ्या संख्येने जमले होते.


गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. खुले वाहन सजवून हर्षदाला मिरवणुकीत नेण्यात आले. मार्गभर लोकांनी पुष्पवर्षाव करीत अभिनंदन केले. हर्षदाच्या कुटुंबीयांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला.


हर्षदाचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी

हर्षदाने ग्रामीण परिसरातील मर्यादित साधनसुविधांमध्ये सातत्याने सराव करत आपल्या खेळ कौशल्याला धार दिली. तिच्या परिश्रमाला जय श्री राम कबड्डी संघातील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा आधार मिळाला.


ग्रामस्थांकडून गौरव – मुलींनीही खेळात पुढे यावे : आवाहन

ग्रामस्थांनी हर्षदाचे कौतुक करून गावातील इतर मुलींनीही क्रीडा क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. ग्रामपंचायतीच्या वतीने हर्षदाचा विशेष सत्कार करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments