पहूर प्रतिनिधी---(ता. जामनेर):
दिशा लाईव्ह न्यूज --::----पहूर येथील श्री शनैश्वर महाराज मंदिर ते श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर या मुख्य मार्गावर उभारण्यात आलेले पथदिवे सध्या ‘चालू–बंद’च्या गोंधळात सापडले असून संपूर्ण पथदिवे व्यवस्थापन कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून कार्यान्वित केलेली ही पथदिवे योजना ढिसाळ नियोजन व निष्काळजी देखभालीमुळे अवघ्या काही महिन्यांतच अपयशी ठरली आहे.
या मार्गावर शेंदुर्णी रस्त्यावर सुमारे ८५ पथदिवे स्तंभ उभारण्यात आले आहेत. मात्र यापैकी निम्म्याहून अधिक पथदिवे अवघ्या चार ते सहा महिन्यांतच बंद पडले आहेत. विशेष म्हणजे कधी दिवसभर पथदिवे सुरू असतात तर कधी संपूर्ण रात्रभर बंद राहत असल्याने नागरिकांसह वाहनचालकही हैराण झाले आहेत.
ठेकेदाराला वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर स्थानिक स्तरावरील व्यवस्थापनही पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रात्री अंधारामुळे अपघाताचा धोका वाढत असून दुसरीकडे दिवसा दिवे सुरू राहिल्याने विजेचा प्रचंड अपव्यय होत आहे.
शासनाने लाखो रुपये खर्च करून दिलेल्या या योजनेचा प्रत्यक्षात ग्रामस्थांना काही उपयोग होतो आहे का? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पथदिव्यांची योग्य दुरुस्ती, देखभाल व वेळनियोजन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त नागरिकांकडून दिला जात आहे.

Post a Comment
0 Comments