Type Here to Get Search Results !

पहूर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सव ! श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात आजपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह कार्यक्रमासाठी तयारी पूर्ण.


पहूरप्रतिनिधी  (ता. जामनेर) :

 दिशा लाईव्ह न्यूज---:::---    जामनेर तालुक्यातील पहूर येथे शेंदुर्णी मार्गावर देवळी व गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सव व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.


श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून गेल्या वीस वर्षांपासून येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व शिव महापुराण कथेचे आयोजन केले जाते. यंदा या सप्ताहाचे २१ वे वर्ष असून दि. १२ फेब्रुवारीपासून  (आजपासून ) अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास प्रारंभ होणार आहे. या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेने संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.


अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहादरम्यान

दि. १२ रोजी ह.भ.प. पंढरीनाथ महाराज (कोऱ्हाळा बाजार),

दि. १३ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (चिंचखेडा),

दि. १४ रोजी ह.भ.प. अश्विनीताई महाराज (पहूर),

दि. १५ रोजी महाशिवरात्रीनिमित्त ह.भ.प. विष्णुदास महाराज (चिंचखेडा),

दि. १६ रोजी ह.भ.प. जान्हवी दीदी महाराज (सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर),

दि. १७ रोजी ह.भ.प. वैष्णवी दीदी महाराज (बुलढाणा),

दि. १८ रोजी ह.भ.प. फकीरा महाराज (जामनेर) यांची कीर्तनसेवा होणार आहे.


दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी ९ वाजता ह.भ.प. बाबुरावजी महाराज पहुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार असून दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताह व यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.


महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात दुग्धाभिषेकाचा धार्मिक विधी पार पडणार असून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ग्रामपंचायत सदस्य तथा मंदिराचे विश्वस्त अशोक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.


तसेच स्वर्गीय सुशीला आई राऊत यांच्या स्मरणार्थ ह.भ.प. सुरेश राऊत यांच्या तर्फे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.


या यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज , उपाध्यक्ष प्रदीप लोढा , सचिव हरिभाऊ राऊत ,  विश्वस्त अशोक जाधव ,  किशोर बनकर , आकाश बनकर ,  दिलीप पाटील , संजय गोतमारे , सुरेश राऊत , ईश्वर हिवाळे , शंकर भामेरे  यांच्यासह सर्व विश्वस्त, भाविक व ग्रामस्थ परिश्रम घेत असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या  वतीने करण्यात आले आहे.


ऐतिहासिक महात्म्य -


हे देवस्थान देवळी आणि गोगडी   या नद्यांच्या संगमावर वसलेले असून  सन  १९९१ मध्ये पूजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी लोकसहभागातून ४२ दिवसांचे मौनव्रत अनुष्ठान करून  मंदिराचा जिर्णोद्धार करून शिवमंदिराची उभारणी केली . सन २००६ मध्ये धर्मदाय कार्यालयात सदर मंदिर ई १०८६ क्रमांकाद्वारे नोंदविण्यात आले असून आज तागायत ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा आणि परिसराचा जिर्णोद्धार आणि विकास कामे सुरू आहेत . राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पर्यटन विकास मंत्रालयातर्फे तीन कोटी रुपयांचा भरीव निधी विकास कामांसाठी मंजूर झाला असून सदर विकास कामे प्रगतीपथावर आहेत . या कामी सरपंच आशाताई शंकर जाधव यांच्यासह  सर्व ग्रामस्थ आणि भाविकांचे सहकार्य लाभत आहे .

Post a Comment

0 Comments