Type Here to Get Search Results !

खानदेश एक्सप्रेसवेचा मार्ग पाळधी(बाट) – रवंज्या – म्हसावद– लोहारा – शेंदुर्णी – सोयगाव – हळदा घाट मार्गे निश्चित करावा : संजय सूर्यवंशी यांचे निवेदन!




दिशा लाईव्ह न्यूज--::---उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणारा प्रस्तावित खानदेश एक्सप्रेस हा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून या महामार्गामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होऊन कृषी, व्यापार व उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

 या पार्श्वभूमीवर खानदेश एक्सप्रेसवेचा मार्ग  बाट पाळधी – रवंज्या – म्हसावद – रोटवद- लोहारा – शेंदुर्णी – सोयगाव – हळदा घाट मार्गे पुढे छत्रपती संभाजीनगर असा निश्चित करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शेंदुर्णी शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक संजय देविदास सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री व जळगाव जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या जळगाव – छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्ग प्रस्तावित असून त्या मार्गाला अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर विरोध होत असल्याची परिस्थिती आहे. तसेच त्या मार्गात ऐतिहासिक व जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसराचा समावेश होत असल्याने त्या भागात मोठे घाटमार्ग, बोगदे व पायाभूत कामे करणे तांत्रिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्या कठीण ठरू शकते.



त्यामुळे खानदेश एक्सप्रेसवेचा मार्ग पाळधी – रंज्या – मसावत – लोहारा – शेंदुर्णी – सोयगाव – हळदा घाट असा निश्चित झाल्यास ऐतिहासिक अजिंठा लेणीच्या डोंगरपट्ट्याला कोणतेही नुकसान होणार नाही, तसेच पर्यावरणाचा समतोल राखत विकासाची गती कायम ठेवता येईल.

याशिवाय या मार्गामुळे एरंडोल, पाचोरा, जामनेर, सोयगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना थेट जोडणी मिळू शकते. परिणामी या संपूर्ण पट्ट्यातील शेती, व्यापार, वाहतूक व उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.



विशेष म्हणजे या मार्गामुळे शेंदुर्णी -लोहारा सारखे वेगाने विकसित होणारे शहर मुख्य प्रवाहातील विकासाशी जोडले जाईल, तसेच स्थानिक शेतकरी, व्यापारी व युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. दीर्घकाळापासून विकासाच्या दृष्टीने तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास या महामार्गामुळे मोठी चालना मिळू शकते.

म्हणून शासनाने स्थानिक नागरिकांच्या भावना, पर्यावरणीय बाबी आणि भविष्यातील विकासाची गरज लक्षात घेऊन खानदेश एक्सप्रेसवेचा मार्ग पाळधी – रवंज्या – म्हसावद– रोटवद- लोहारा – शेंदुर्णी – सोयगाव – हळदा घाट मार्गे निश्चित करावा, अशी मागणी संजय सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments