सोयगाव प्रतिनिधी -:-दत्तात्रय काटोले
सोयगाव : जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीतून इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींचा जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी कडूबा ढगे तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगावची विद्यार्थिनी कुमारी क्रांती निलेश गावडे यांनी या परीक्षेत यश संपादन करून जिल्हास्तरावरून इस्रो सहलीसाठी निवड मिळवली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गुरुमाऊली स्वामी समर्थ केंद्र सोयगावच्या वतीने तसेच समाजसेवक रवींद्र काळे व शिक्षक भास्कर चौधरी यांच्या पुढाकारातून विद्यार्थिनींना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषिभूषण अरुणभाऊ सोहनी व कृष्ण जुनघरे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली प्रतिभा योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मोठी भरारी घेऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला समाजसेवक संजयभाऊ शहापूरकर, नगरसेवक राजू दुतोंडे, अरुण सोहनी, मयूर मनगटे, मंगेश सोहनी, रवींद्र साखळे, केंद्रीय मुख्याध्यापक किरण पाटील, पंकज रगडे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड यांचे प्रतिनिधी दौलतसिंग परदेशी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक भास्कर चौधरी, शिवाजी नवले, विद्याधर बागुल, राजेंद्र उंबरकर, तुकाराम पायाघन, संगीता सोनवणे, जया वाघ, संतोष भारद्वाज, वैजनाथ सावळे, शिवराम आगे, सचिन ढगे, सीमा राऊत यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध स्तरांतून या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल तसेच शाळेच्या कार्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.
“जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथील अनेक विद्यार्थी हे गरीब व कष्टकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या पालकांचा व्यवसाय हातमजुरी व शेतीमजुरीचा असला तरीही हे विद्यार्थी मेहनतीच्या जोरावर आपल्या पालकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करत आहेत. शिक्षणाबरोबरच निबंध स्पर्धा, कबड्डी, खो-खो अशा विविध स्पर्धांमध्येही त्यांनी यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे,
असे मत कृषिभूषण अरुण सोहनी यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार :
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठे असावे. मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही आकाशाला गवसणी घालू शकतात.”



Post a Comment
0 Comments