Type Here to Get Search Results !

काशिनाथ फुलसुंदर यांचा तमाशा व्यवस्थापकाचा प्रवास....



काशिनाथ आल्हाट --तमाशा अभ्यासक 

तमाशा पंढरी नारायणगाव-:- 8830857875

दिशा लाईव्ह न्यूज--::---चैत्र महिन्याला मराठीत वर्षाचा पहिला महिना म्हणून ओळखला जातो.' या महिन्यातच गुढीपाडवा सण मोठ्या आनंदाने महाराष्ट्र साजरा केला जातो.


   या महिन्यात  निसर्गात पालवी फुटते.चैतन्य निर्माण होते. झाडांना फुले फुलतात. हवामानात बदल होतो.


चैत्र महिन्यात शेतकऱ्याची शेतीची कामे सर्व आटोपलेली असतात .शेतकरी राजा धनधान्याने समृद्ध झालेला असतो.  ग्रामदैवताच्या  जत्रा यात्रांना सुरुवात  होते."गावची यात्रा म्हटली की, तमाशा हे समीकरण आहे"! ही अनेक वर्षाची परंपरा आहे.


  लोककलेचे बाळकडू ज्यांना मिळाले. ते तमाशाचे ज्येष्ठ व्यवस्थापक काशिनाथ महादेव फुलसुंदर .  जन्मगाव पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे .


खरे तर ! फुलसुंदर या घराण्याला  वडील महादेव फुलसुंदरांपासून कलगी  तुरा कलेचा वारसा लाभला. कलेचे बाळकडू हे काशिनाथ फुलसुंदर यांना प्राप्त झाले . वडील भेदिक लावण्याचा कार्यक्रम सादर करत. बहीण मंदाबाई खराडे या शाहिरी सादर करत. ऐतिहासिक कालखंड पोवाड्याच्या रूपाने सादर करणारी ही महिला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आज पर्यंत विविध संस्था संघटनांनी 50 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.


   त्यामुळे कलेची अस्मिता ही बालपणापासून सतत होती.  अशा या घराण्यात  काशिनाथ फुलसुंदर जन्माला आले.


'जगण्याचे साधन नोकरी पाहिजे'. आणि आयुष्य आनंदी जगण्यासाठी कला पाहिजे".! नोकरीबरोबरच कलेची अस्मिता त्यांची कमी झाली नाही. कलेची  नाळ  त्यांची कायम राहिली.


  वयाच्या  15 व्या वर्षापासून कलेच्या क्षेत्राशी निगडित आहेत. पिंपळवंडी येथे  दरवर्षी नाटक सादर केले जात होते. या नाटकात ते सक्रिय सहभागी होत. नाटकात त्यांची गाजलेली भूमिका "कल्लू बेरड' अनेक वर्ष नाटक रसिकांच्या लक्षात राहिली होती 


  काशिनाथ फुलसुंदर हे पाटबंधारे खात्यात नोकरी करत असताना आणि  सेवानिवृत्तीनंतरही तमाशा लोककला

त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. 


तमाशा  ही कला महाराष्ट्रात  शतकांनो शतके चालत आलेली आहे." लोककला ही पारंपरिक लोकप्रिय झालेली आहे" 



"तमाशा फक्त मनोरंजनाचे साधन नाही

 तर, गण गवळण बतावणी आणि वगनाट्य याच्यातून महाराष्ट्राची संस्कृती दिसते. लोककला समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे साधन आहे." 'ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ" म्हणजे तमाशा" ग्रामीण भाषेत, स्थानिक भाषेत, लोक भाषेत तमाशा कला ही सादर केली जाते" या तमाशा कलेच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही .तर जाती भेदाच्या भिंतीही दूर केल्या जातात.


 अशा लोककलेची आवड काशिनाथ फुलसुंदर यांना लहानपणापासून लागली. ती जपली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मनाशी निश्चय केला. की, यापुढे तमाशा रसिकांची सेवा करायची. यासाठी  तमाशा क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला.

   

संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशा फडातून व्यवस्थापकीय कामाची सुरुवात  केली . 


   चैत्र महिन्यात तमाशा पंढरी नारायणगाव येथे महाराष्ट्रातील तमाशा फडमालक हे तमाशा पंढरीत आपल्या राहुट्या दाखल करतात. आणि त्यामध्ये संगीतरत्न दत्ता महाडिक यांची सुद्धा राहूटी  सालाबाद वर्षाप्रमाणेच असते. तमाशा ठरवायला  आलेल्या गावकऱ्यांशी,कसे बोलावे ?यात्रा कमिटीशी कसे बोलावे? कसा संवाद साधावा ?हे अनुभवातून शिकत गेले. मोठ्या फडातील अनुभव हा लहान तमाशा फडांचे व्यवस्थापन करण्यासाठी कामी आला. 


  सौ.मनीषा सिद्धटेककर,नंदाराणी भोकटे पुणेकर  आणि या वर्षी जगनकुमार वेळवंडकर सह हौसाराणी पुणेकर या तमाशा फडाचे व्यवस्थापक म्हणून ते काम पहात आहेत.



काशिनाथ फुलसुंदर यांचा व्यवस्थापकाचा प्रवास हा वेगवेगळ्या तमाशा फडाच्या माध्यमातून झाल्याने गावकऱ्यांशी बोलणे ,सुपर ठरवणे, त्यांच्याशी चर्चा करणे, असा  स्वतःचा अनुभव ते इतर असणाऱ्या व्यवस्थापकांशी बोलतात. त्यामुळे इतर  फडातील व्यवस्थापकांनाही त्याची माहिती होते.

  

   तमाशा क्षेत्रातील जेष्ठ व्यवस्थापक म्हणून काशिनाथ फुलसुंदर यांच्याकडे पाहिले जाते. सध्या ते संगीताचा बादशहा जगनकुमार वेळवंडकर सह  हौसाराणी पुणेकर या तमाशा फडाचे व्यवस्थापक म्हणून ते काम पाहतात.


    यावर्षी या तमाशा फडाच्या 55 कलाकारांच्या  संचात, गावाच्या पसंतीचा, 4 गाड्यांचा आणि 30 बाय 30 रंगमंच, आणि डॉल्बी साऊंड सिस्टिमच्या या संचाचे ते उत्तम नियोजन करताना त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे.


    गुढीपाडव्यापासून सुरू झालेला तमाशा  हंगाम. यावर्षी सर्व फड मालकांना ज्याप्रमाणे आनंदात गेला आहे .त्याप्रमाणे जगनकुमार यांनाही उत्तम गेला आहे.वेळवंडकर या तमाशा फडाला सुद्धा चांगल्या प्रकारची मागणी आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 याचे समाधान काशिनाथ फुलसुंदर यांचे चेहऱ्यावर दिसते आहे.  


     तमाशा व्यवस्थापक म्हणून  काम करताना  ताण तणाव न घेता, स्वतः स्वीकारलेली जबाबदारी आणि त्यातून मिळणारा आनंद  वेगळा असतो.


   "कृष्णाच्या बासरीने फुले, फळे आणि निसर्ग भारावून जातो. त्या पद्धतीने चैत्र महिन्यात तमाशा पंढरी नारायणगाव येथे तमाशाच्या राहूट्यात व्यवस्थापनाचे काम करताना मन भारावून जाते .


  गुढीपाडवा ते अक्षय तृतीया हा कालावधी कधी संपून जातो .हे कळत नाही आणि पुन्हा एकदा चैत्र महिन्याची आस लागते.

Post a Comment

0 Comments