Type Here to Get Search Results !

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; देऊळगाव गुजरीत अवैध धंदेवाल्यांची दादागिरी उघड. फोटो काढण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ल्याचा प्रयत्न; दोषींवर कठोर कारवाईची मागणी. फत्तेपूर पोलिसांना इशारा : पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी!!


(फत्तेपूर)  --::--प्रतिनिधी -कृष्णा पाटील.

 दिशा लाईव्ह न्यूज--::---जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार संजय जटाळे हे वृत्त संकलनासाठी व फोटो काढण्यासाठी गेले असता, अवैध धंदा चालवणाऱ्या गोपाल साईदास तवर याने त्यांना अडवून जीवे मारण्याची तसेच पेटवून देण्याची धमकी दिली. यावेळी पत्रकाराच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


            पोलिसांची भूमिका?

या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये एन.सी.आर. दाखल करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. संबंधित आरोपींवर पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


या वेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप देशमुख, जामनेर तालुका अध्यक्ष संजय जटाळे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा पाटील रहीम पठाण, सुनील चोरमाले, तसेच पत्रकार सलीम पटेल, जब्बार तडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकाराला सार्वजनिक ठिकाणी धमक्या देणे व त्याच्या कामात अडथळा आणणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

                         आंदोलनाचा इशारा

                   पत्रकार संघटनेचा आंदोलनाचा इशारा

दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments