Type Here to Get Search Results !

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; पती-पत्नीला अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी!! पिंपळगाव हरे पोलिसांची दमदार कामगिरी..




पाचोरा--::-  अनिल आबा येवले

दिशा लाईव्ह न्यूज--::---पाचोरा : पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक सत्य समोर आले असून प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरसाडे तांडा, ता. पाचोरा येथील संजय भिमा राठोड (वय ३३, व्यवसाय – मजुरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.३० ते २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर गेला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे मिसिंग रजिस्टर क्रमांक १५/२०२६ नुसार २६ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.



या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या पथकाने सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे संजय परशुराम जाधव याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसी चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली.

तपासात उघड झाले की, आरोपी संजय जाधव याची पत्नी सोनाली संजय जाधव हिचे मयत विजय राठोड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजय राठोड याने सोनाली हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले होते व त्याद्वारे तो तिला धमकावत होता. ही बाब समजल्यानंतर संजय जाधव याने पत्नी सोनाली हिच्यासह विजय राठोड याची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली.



या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.

सदर कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात पोउपनि विठ्ठल पवार, पोहेकॉ किरण ब्राम्हणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे व सागर पाटील यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments