Type Here to Get Search Results !

लोहारा आणि परिसरात Jio नेटवर्क अत्यंत संथ गतीने-- 8 दिवसांपासून jio चे ग्राहक हैराण!



दिशा लाईव्ह न्यूज---:::---पाचोरा  तालुक्यातील लोहारा आणि परिसरामध्ये जिओ कंपनीचा मोबाईल नेटवर्क टॉवर गेल्या काही वर्षांपासून उभारण्यात आलेला असला तरी नागरिकांना अपेक्षित दर्जाची सेवा मिळत नसल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे   जळगांव जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत वारंवार या प्रश्नांकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं म्हणून वेळोवेळी दिशा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.

 आताही गेल्या 8 ते 10 दिवसांपासून  गावातील इंटरनेट सेवा अत्यंत मंद गतीने सुरू असून अनेक वेळा नेटवर्क  पूर्णपणे बंद पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



गावातील नागरिक नियमितपणे जिओचे रिचार्ज करत असतानाही समाधानकारक सेवा मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. इंटरनेट सेवा खंडित होत असल्यामुळे ऑनलाइन ,शैक्षणिक उपक्रम, शासकीय कामे, बँकिंग व्यवहार तसेच इतर डिजिटल सेवा यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

तसेच आऊटगोइंग व इनकमिंग कॉलदरम्यान संभाषण अचानक खंडित होणे, आवाज अस्पष्ट येणे ,कॉल न लागणे अशा तक्रारी वारंवार होत आहेत. गावात सुशिक्षित नागरिकांची संख्या मोठी असून विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी,बँक, व नोकरदार वर्गाला नेटवर्कअभावी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



डिजिटल युगातही मूलभूत दूरसंचार सुविधा व्यवस्थित उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाने तसेच संबंधित कंपनीने तात्काळ दखल घेऊन नेटवर्क समस्या कायमस्वरूपी सोडवावी, आवश्यक असल्यास अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारावा किंवा विद्यमान टॉवरची क्षमता वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून लोहारा आणि परिसरातील  नागरिकांना दर्जेदार नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments