दिशा लाईव्ह न्यूज--::----(अनिल येवले-पाचोरा) हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत मा. पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनमुळे अवैध धंद्यांवर मोठा आणि निर्णायक आघात झाला आहे. पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सातगाव डोंगरी येथे सुपडु रहमान तडवी हा गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन बाळगत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. तसेच लोहारा दुरक्षेत्रातील म्हसास गावात विक्रम सिताराम बोरसे व सुनंदाबाई नारायण भिल हे आपल्या घराच्या आडोशाला गावठी दारूची चोरटी विक्री करताना आढळून आले.
सांगवी येथे ग्रामपंचायतीच्या मागील सार्वजनिक जागेत कौशल्याबाई मदन कोळी व मदन दगडू कोळी हेही बेकायदेशीर दारू विक्री करताना रंगेहाथ पकडले गेले. या सर्व कारवायांमध्ये एकूण १,६३६ लिटर गावठी हातभट्टी दारू व कच्चे रसायन असा सुमारे ५९,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय, कुर्हाड गावात पाचोरा रोडवरील एका बंद टपरीच्या आडोशाला प्रकाश शिवदास भिल व सविता प्रकाश भिल हे ताडीची विक्री करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून १० लिटर ताडी जप्त करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या अचूक नियोजनातून सातगाव डोंगरी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरही मोठी कारवाई करण्यात आली. आंब्याच्या झाडाखाली सुरू असलेल्या या जुगार खेळावर छापा टाकत पोलिसांनी २,६४,८०० रुपये रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल व पत्त्यांचा संच जप्त केला. काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असले तरी दत्तू वाल्मिक मोकळे व नंदलाल बाजीराव पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कारवाई मा. पोलीस अधिक्षक, जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने दाखविलेली तत्परता आणि पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचे नेतृत्व हे या यशाचे प्रमुख कारण ठरले आहे.
अवैध दारू व जुगाराच्या वाढत्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल निश्चितच गुन्हेगारांसाठी इशारा ठरणार असून, “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही” हा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे देण्यात आला आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments