Type Here to Get Search Results !

वाकडी ,ता.जामनेर शिवारात एकाच रात्री १३ शेतकऱ्यांना चोरट्यांचा फटका---शेतकरी भयभीत.


 बाळू जोशी-वाकडी, ता. जामनेर  दि. २० एप्रिल २०२६

दिशा लाईव्ह न्यूज--::--जामनेर तालुक्यातील वाकडी शिवारात १७ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल १३ शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर केबल आणि हरभऱ्याचा माल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एकाच रात्री सुमारे ₹९१,८०० किंमतीचा माल चोरून नेला. यामध्ये अंदाजे ₹७५,००० किंमतीच्या इलेक्ट्रिक केबल्स तसेच सुमारे तीन क्विंटल हरभऱ्याचा समावेश आहे.

या प्रकरणातील फिर्यादी शेतकरी दिलीप देवसिंग परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते १७ एप्रिल रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतातून घरी परतले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यावर पिकाच्या शेडमधून हरभरा चोरीस गेल्याचे तसेच विहिरीवरील मोटरची केबल कापून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.



याबाबत त्यांनी तत्काळ शेजारील शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर परिसरातील इतर शेतकरी – दीपक परदेशी, भगतसिंग परदेशी, रवींद्र परदेशी, दगडू मूळे, गौरव मुळे, प्रकाश नाणी, निकास परदेशी, भास्कर देक्कर, सोपान बोरसे, गणेश परदेशी – यांनीही आपल्या शेतात पाहणी केली असता त्यांच्या विहिरीवरील केबल्सही चोरीला गेल्याचे उघड झाले.

विशेष म्हणजे, वाकडी व फत्तेपूर शिवारात याआधीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून, वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव पुढील तपास करत आहेत.

            शेतकऱ्यांची मागणी....

सतत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांना तात्काळ अटक करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments