Type Here to Get Search Results !

पहूरच्या तरुणांची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात साकारणार भव्य 'शिवसृष्टी '



पहूर प्रतिनिधी- (ता. जामनेर) 

दिशा लाईव्ह न्यूज--::– जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या पहूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, या मागणीसाठी पहूरच्या तरुणांनी पुढाकार घेत थेट मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.


अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत तरुणांनी मंत्री महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन लेखी निवेदन सादर केले. यावेळी मंत्री महाजन यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि नियोजित स्थळाची पाहणी करण्याचे निर्देश दिले.


पहूरमध्ये शिवसृष्टी उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले होते; मात्र आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विराट हिंदू संमेलनात सांगली येथील ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांनी पहूरसारख्या गावात शिवसृष्टी उभारण्याची गरज अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरित केले. त्यानंतर दुर्गा भवानी माता मंदिर, जामनेर रोड येथे तातडीची बैठक घेऊन मंत्री महाजन यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


मंत्री गिरीश महाजन यांनी पहूरकरांना आश्वस्त करत प्रशासनास कामाला गती देण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. डी. पाटील, आर्किटेक्ट पारगावकर, अभियंता प्रमोद सुशीर व चौधरी आदी अधिकाऱ्यांकडून सलग दोन दिवस  प्रत्यक्ष पाहणी करून शिवसृष्टीचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments