दिशा लाईव्ह न्यूज-::-- जिल्ह्यातील आळंदी परिसरात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. आईच्या काळजीपोटी केलेल्या एका छोट्याशा उपाययोजनाच निष्पाप बालकाच्या जीवावर बेतल्याने कुटुंबासह समाजमन सुन्न झाले आहे.
पाचोऱ्यातील आमचे पत्रकार मित्र गणेश शिंदे यांच्या भाचीच्या मुलाचा झालेला हा दुर्दैवी अंत -अनेकांना विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे.
या घटनेतील मयत चिमुकल्याचे नाव चि. मोक्ष संदीप काळे असे असून तो अवघ्या दोन वर्षांचा होता. नुकताच १ जानेवारी २०२६ रोजी त्याचा दुसरा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता. मात्र काही महिन्यांतच नियतीने त्याला कुटुंबापासून हिरावून घेतल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मूळ जामनेर तालुक्यातील फतेपूर किन्ही येथील प्रगतशील शेतकरी सुभाष काळे यांचे चिरंजीव संदीप काळे हे आपल्या पत्नी योगिता काळे आणि दोन मुलांसह पुणे येथील आळंदी परिसरात वास्तव्यास आहेत. संदीप काळे हे आर्मीत क्लार्क म्हणून कार्यरत असून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत ते आपल्या संसारात समाधानी जीवन जगत होते.
मात्र एका अनपेक्षित घटनेने त्यांच्या आयुष्याचा पाया हादरून गेला. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे संदीप काळे कामासाठी घराबाहेर पडले. घरात योगिता काळे या आपल्या लहानग्या मोक्षची काळजी घेत होत्या. सकाळच्या वेळेत त्यांनी मोक्षला प्रेमाने आंघोळ घातली, त्याची तयारी केली आणि त्याला दूध पाजले. घरातील कामे आटोपण्यासाठी त्यांनी मोक्षला झोक्यात झोपवले. लहान मुलं झोपेतून उठल्यानंतर झोक्यातून पडू नयेत म्हणून आईने काळजीपूर्वक झोक्याच्या मध्यभागी एक रुमाल बांधला. हीच छोटीशी काळजी काही क्षणांत दुर्दैवी ठरली.
घरातील इतर कामात गुंतलेल्या योगिता काळे यांना काही वेळाने झोक्याकडे पाहण्याची इच्छा झाली. त्यांनी झोक्याकडे नजर टाकली असता मोक्ष झोक्याखालच्या दिशेने उतरण्याचा प्रयत्न करताना त्या बांधलेल्या रुमालात अडकलेला दिसला. त्या क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तात्काळ मोक्षला बाहेर काढले,
परंतु तो कोणतीही हालचाल करत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावले. लगेचच वडील संदीप काळे यांना कळविण्यात आले. आई-वडिलांनी मोक्षला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, परंतु त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. दुपारच्या सुमारास डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले, परंतु मोक्षची प्रकृती सुधारत नव्हती. सायंकाळपर्यंत कुटुंबीय, नातेवाईक रुग्णालयात पोहोचू लागले.
आईचे मामा, मामी, मावशी, मावस भाऊ, वहिनी सर्वजण भेटण्यासाठी आले होते. प्रत्येकाच्या मनात एकच आशा होती—मोक्ष पुन्हा डोळे उघडेल. परंतु रात्री उशिरा डॉक्टरांनी मोक्षचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आणि त्या क्षणी रुग्णालयात एकच हंबरडा फोडण्यात आला.
या घटनेने केवळ काळे कुटुंब नव्हे, तर फतेपूर किन्ही ,पाचोराआणि आळंदी परिसरातही शोककळा पसरली आहे. गावातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
काही महिन्यांपूर्वी ज्या घरात वाढदिवसाच्या आनंदाचा उत्सव साजरा झाला होता, त्या घरात आता दुःखाचे सावट दाटून आले आहे. या दुःखद प्रसंगी ‘झुंज’ वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप महाजन तसेच त्यांचा संपूर्ण परिवार यांनी काळे कुटुंबीयांच्या दुःखात मनःपूर्वक सहभाग नोंदवून भावपूर्ण संवेदना व्यक्त केल्या आहेत.
या घटनेतून एक अत्यंत महत्त्वाचा संदेशही समोर येतो. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण करत असलेल्या उपाययोजना कधी कधी अनपेक्षितपणे धोकादायक ठरू शकतात.
विशेषतः झोक्यात, पाळण्यात किंवा बेडवर मुलांना ठेवताना कोणतीही वस्तू त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा ठरणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कारण लहान मुलं अचानक जागी होऊन हालचाल करतात आणि त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेची जाणीव नसते. मोक्षच्या मृत्यूने आई-वडिलांसाठी एक न भरून येणारी पोकळी निर्माण केली आहे. योगिता काळे यांच्यासाठी हा प्रसंग आयुष्यभर विसरता येणार नाही, तर संदीप काळे यांच्यावरही दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
एका क्षणात त्यांचे संपूर्ण जग बदलून गेले. समाजातील अनेकांनी या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करताना अशा दुर्घटना टाळण्यासाठी जनजागृतीची गरज अधोरेखित केली आहे. बालसंगोपन करताना प्रत्येक क्षणी जागरूक राहणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.
निष्पाप मोक्षच्या आठवणी आता त्याच्या कुटुंबीयांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. त्याचे निरागस हास्य, खेळकर स्वभाव आणि छोट्या छोट्या क्षणांनी भरलेले आयुष्य आता फक्त आठवणीत उरले आहे. नियतीने केलेल्या या अन्यायामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत असून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे—आईच्या काळजीतूनच असा घात कसा घडला?

Post a Comment
0 Comments