पाचोरा– अनिल आबा येवले,
दिशा लाईव्ह न्यूज --::---प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनसेवेची अखंड तळमळ यांचा सुंदर संगम म्हणजे पाचोरा तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. विजयजी बनसोडे! आपल्या निष्ठावंत कार्यपद्धतीमुळे त्यांनी केवळ प्रशासनातच नव्हे, तर जनमानसातही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून धरणगाव तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले – हा संपूर्ण पाचोरा तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “लोकसेवा हक्क दिन” निमित्त नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि समाधानकारक सेवा दिल्याबद्दल हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला. दि. २८ एप्रिल २०२६ रोजी अपर जिल्हाधिकारी जळगाव मा. डॉ. श्रीमंत हारकर यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे, वारकरी संप्रदायातील माळकरी म्हणून त्यांच्या आयुष्यातील साधेपणा, संयम आणि सेवाभाव हे गुण त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येतात. “जनता हीच खरी देवता” मानून ते प्रत्येक नागरिकाशी आदराने वागतात. त्यांच्या या संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे प्रशासनावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या सन्मानामुळे केवळ एका अधिकाऱ्याचा गौरव झाला नाही, तर संपूर्ण पाचोरा तालुक्याच्या प्रशासनाचा मान उंचावला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही” याचा जिवंत पुरावा त्यांनी घालून दिला आहे.
तहसीलदार विजय बनसोडे यांचे कार्य म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा प्रवास असाच यशस्वीपणे पुढे जात राहो आणि प्रशासनात अशाच कार्यतत्पर अधिकाऱ्यांची संख्या वाढत राहो, हीच सर्वांची मनापासून अपेक्षा आहे.



Post a Comment
0 Comments