Type Here to Get Search Results !

पहूर येथे भीषण अपघात; भरधाव पिकअपने घेतला निरपराध तरुणाचा बळी राष्ट्रीय महामार्ग की मृत्यूचा सापळा? नागरिकांचा संताप; गतिरोधकांची तातडीची मागणी





दिशा लाईव्ह न्यूज --::---–(पहूर प्रतिनिधी )  जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने उभ्या असलेल्या सेंट्रो कारला जोरदार धडक दिल्याने अमिनोद्दीन शेख कमारुद्दीन (वय ४७) यांचा दुर्दैवी आणि हृदयद्रावक मृत्यू झाला.



प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे वेगात येणाऱ्या पिकअपने (क्र. एमएच १९ सीवाय ९२०२) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सेंट्रो (क्र. एमएच ०४ एफए ८०४१) कारला मागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारजवळ उभे असलेले अमिनोद्दीन शेख यांनी जीव वाचवण्यासाठी क्षणार्धात बाजूला धाव घेतली. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं—धडक दिल्यानंतर पिकअप वाहन उलटून थेट त्यांच्या अंगावरच कोसळले.

त्या क्षणी उपस्थित लोकांनी भयचकित होऊन आरडाओरड सुरू केली. काहींनी धाव घेत तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या कष्टाने अमिनोद्दीन शेख यांना वाहनाखालून बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. छातीवर झालेल्या गंभीर मारामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.



या अपघातात सलीम अनिस शेख हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणीनंतर अमिनोद्दीन शेख यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात संताप होता.

                    नागरिकांचा संताप उसळला

जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग हा आता “मृत्यूचा सापळा” बनत चालल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वारंवार होणारे अपघात, बेफाम वेग, आणि सुरक्षेची अपुरी साधने यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

“राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजून किती जणांचा बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. विशेषतः म्हाडा वसाहतीसमोर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी समजूत काढत शांतता प्रस्थापित केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

                        कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अमिनोद्दीन शेख यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, आई, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष हरपल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

“सकाळी घरातून हसत-खेळत गेलेले व्यक्ती संध्याकाळी कायमचे निघून जातील, याची कुणालाच कल्पना नव्हती,” असे सांगताना नातेवाईकांचे डोळे पाणावले.

                उद्या अंत्यसंस्कार

मयत अमिनोद्दीन शेख यांचे अंत्यसंस्कार रविवारी सकाळी दहा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

हा अपघात केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला जागं करणारा इशारा आहे. वेळेवर उपाययोजना न झाल्यास हा महामार्ग आणखी कित्येक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आता तरी संबंधित प्रशासनाने जागे होऊन ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments