दिशा लाईव्ह न्यूज:-- : बार्शी शहराजवळील बार्शी–परंडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेली घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी ठरली. काही महिन्यांपूर्वी प्रेमाच्या नात्यातून एकत्र आलेल्या दाम्पत्याचा संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाला… आणि त्या प्रेमकथेचा शेवट इतका भयावह असेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती.
ऋषिकेश पाटील याने स्वतःच्या पत्नी धनश्री पाटील हिच्यावर भररस्त्यात चाकूने तब्बल ५० वार करत निर्दयीपणे तिचा जीव घेतला. एकेकाळी जिच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्नं पाहिली, तिच्याच छातीत चाकू खुपसताना त्याच्या मनात क्षणभरही दया आली नाही… शेवटी तिचा गळाही चिरण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात धनश्रीने जागीच प्राण सोडले.
दोघेही उच्चशिक्षित… चांगल्या नोकरीत… समाजात स्थिरस्थावर आयुष्य जगत होते. काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह करून संसाराची नवी सुरुवात केली होती. सुरुवातीचे काही दिवस सुखाचे गेले… पण नंतर संशयाची सावली या नात्यावर पडली. किरकोळ वादातून सुरू झालेली भांडणं हळूहळू विकोपाला गेली… आणि शेवटी संशयाने या प्रेमकथेचा जीव घेतला.
सोमवारी धनश्री नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती… पण तिच्या वाटेत मृत्यू दबा धरून बसला होता. रस्त्यावरच पतीने हल्ला चढवला. ही थरारक घटना पाहून काही नागरिक घाबरून दूर पळाले, तर काहींनी धाडस करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापाच्या भरात बेभान झालेल्या ऋषिकेशने त्यांनाही धमकावत मागे हटवले… आणि वार करत राहिला… जोपर्यंत धनश्रीचा जीव गेला नाही.
घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
एक हृदय हेलावून टाकणारा प्रश्न मात्र उरतो… ज्या नात्याची सुरुवात प्रेमाने झाली… त्याचा शेवट इतक्या क्रूरतेत कसा झाला?
बार्शी शहरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असून, प्रेम, विश्वास आणि नात्यांची किंमत पुन्हा एकदा विचारात टाकणारी ही घटना ठरली आहे.

Post a Comment
0 Comments