पहूर प्रतिनिधी--ता. जामनेर :
दिशा लाईव्ह न्यूज--::--जामनेर तालुक्यातील पहूर-कसबे येथे देवळी व गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांमधून सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विविध विकासकामांना सुरुवात झाली असून, विकासाच्या नावाखाली मंदिर व परिसराचे दोन तुकडे होऊ दिले जाणार नाहीत, असा ठाम आणि एकमुखी निर्णय श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या गुरुवार, २८मे २०२६ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे नोंदणीकृत मंदिर असून परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन संचालनालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना आणि महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी एवढा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल ट्रस्टतर्फे ना. गिरीश महाजन यांचे अभिनंदन करण्यात आले.
विविध विकासकामांना गती
मंजूर निधीतून मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान तसेच देवळी व गोगडी नदी तटांवर विविध विकासकामे करण्यात येत आहेत. यात पुरसंरक्षण भिंत, घाट, सभामंडप, वॉल कंपाऊंड, भक्तनिवास, पाण्याची टाकी, शौचालय, सौरऊर्जा पॅनल, चिल्ड्रन पार्क, अंतर्गत रस्ते, वृक्षारोपण व संवर्धन, स्वागत कमान आणि कूपनलिका आदी कामांचा समावेश आहे. या विकासामुळे परिसराचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
मंदिराच्या अस्तित्वाला धक्का सहन केला जाणार नाही
बैठकीत मंदिर परिसराचे विकासाच्या नावाखाली विभाजन करण्याचा प्रयत्न होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. मंदिराचा भूखंड, धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा कोणत्याही परिस्थितीत मोडीत निघू दिल्या जाणार नाहीत. असा कोणताही प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडला जाईल, असा निर्धार विश्वस्त मंडळाने व्यक्त केला.
ही बैठक श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धारक शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप लोढा, विश्वस्त मदन शहापुरे, संजय गोतमारे, अशोक जाधव, किशोर बनकर, ईश्वर हिवाळे तसेच भाविक शरद बेलपत्रे, शंकर भामेरे आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट दर्जाच्या कामांची भाविकांची अपेक्षा
मंदिर परिसरातील सर्व विकासकामे उत्कृष्ट दर्जाची व्हावीत आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ भाविकांना मिळावा, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. ट्रस्टकडून विकासकामांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, लवकरच ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण होणार असल्याची माहिती देण्यात आली.
मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा संकल्प
१९९१ मध्ये शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केवळ १ फळ सेवन करून ४२ दिवस मौनव्रत अनुष्ठान करत श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे .या मंदीराचा पुणर्जीर्णोद्धार तसेच क्षेत्र संगमेश्वर हनुमान मंदिराच्या कलशारोहणाचा संकल्प शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केला असून, लोकसहभागातून हे धार्मिक कार्य पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments