जामनेर प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज-:-: परिसरात अवैध दारू विक्रीचा उच्छाद वाढत असतानाच अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेमुळे हिवरखेडा गावात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेडा गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून त्याचा थेट परिणाम युवक व अल्पवयीनांवर होत आहे. गावातील काही भागात दिवसाढवळ्या दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याने दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालक वर्गात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच गावातील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे. दोषींना कुठलाही पाठीशी घालणार नाही, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. तसेच, गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.
सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी एकत्र येत अशा घटनांविरोधात आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली आहे. गावातील तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्याचीही मागणी पुढे येत आहे.
ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment
0 Comments