Type Here to Get Search Results !

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न!



दिशा लाईव्ह न्यूज – लोहारा-:-(दिनेश चौधरी, लोहारा)-- “उंच आकाशी झेप घे रे पाखरा...” या प्रेरणादायी ओळींचा साक्षात अनुभव देणारा, आठवणींनी ओथंबलेला आणि गुरुजनांविषयी कृतज्ञतेने भरलेला स्नेह मेळावा डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे दिनांक १७ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. सन २००१-०२ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल अनेक वर्षांनंतर एकत्र येत मैत्री, प्रेम आणि आदर यांचा अनोखा संगम साकारला.



कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे प्रेरणास्थान कै. आचार्य बापूसाहेब यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी वातावरणात एक वेगळीच भावनिक उंची निर्माण झाली होती. जणू काही प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यात उंच भरारी घेत असताना त्या उंचीचा पाया घालणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत होता.

“उंच आकाशी झेप घे रे पाखरा...” या ओळी केवळ गीतात मर्यादित न राहता प्रत्येक माजी विद्यार्थ्याच्या जीवनात साकार झालेल्या वाटल्या. या विद्यालयाच्या छत्रछायेत शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाने आज आयुष्यात आपापल्या क्षेत्रात यश संपादन केले असून, त्या उंच भरारीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा मेळावा जणू एक सुंदर निमित्त ठरला.



माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे अत्यंत प्रेमळ आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने स्वागत केले. फुलांची पुष्पवृष्टी, शाल, बुके व श्री गणेशाची प्रतिमा देऊन व्यक्त केलेला आदर पाहून अनेक शिक्षक भावूक झाले. गुरु-शिष्य नात्याचे हे जिवंत उदाहरण उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेले.

कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत देखणे आणि बारकाईने केलेले होते. भव्य मंडप, आरामदायी बैठक व्यवस्था, उष्णतेचा विचार करून लावलेले मोठे कूलर, जनरेटरची सुविधा, सकाळच्या चहा-नाश्त्यापासून ते दुपारच्या मिष्टान्न जेवणापर्यंतची उत्तम व्यवस्था आणि बोरसे केदार या माजी विद्यार्थ्याच्या स्वतःच्या ब्रँडचे आईस्क्रीम – या सर्वांनी कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. त्यातच संगीताची मैफिल उपस्थितांना जुन्या आठवणींमध्ये रमवून गेली.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. व्ही. जोशी सर होते. यावेळी अ. अ. पटेल सर, पी. डी. रोनखेडे सर, पी. एम. सुर्वे सर, एस. टी. चौधरी सर, पी. यू. खरे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अनेक स्नेहमेळावे पाहिले, पण इतक्या सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा झालेला हा मेळावा निश्चितच स्मरणात राहणारा आहे.”

या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट म्हणून क्रॉम्प्टन कंपनीचे १० सिलिंग फॅन देऊन आपल्या कृतज्ञतेची जाणीव करून दिली. एस. के. पाटील सर, व्ही. एम. शिरपुरे सर, ए. आर. लिंगायत सर आणि पी. व्ही. जोशी सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.



या संपूर्ण कार्यक्रमासाठी लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप व्यंकट कोळी, बबलू समाधान भगत आणि राजू शालिक कोळी यांनी घेतलेले विशेष आणि अथक परिश्रम खरोखरच कौतुकास्पद ठरले. त्यांच्या मेहनतीमुळे मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित राहू शकले आणि कार्यक्रमाला एक भव्य रूप प्राप्त झाले.

हा स्नेह मेळावा केवळ भेटीगाठींचा नव्हता, तर तो होता आठवणींचा खजिना उघडणारा, शिक्षकांविषयी प्रेम व्यक्त करणारा आणि मैत्रीचे नाते अधिक दृढ करणारा एक अविस्मरणीय सोहळा.

खरंच, “उंच आकाशी झेप घे रे पाखरा...” या ओळींसारखेच प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यात उंच भरारी घेत असताना, त्या भरारीची सुरुवात ज्या शाळेतून झाली, त्या शाळेप्रती असलेले प्रेम आणि ऋण या मेळाव्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



Post a Comment

0 Comments