Type Here to Get Search Results !

शेंगोळा,ता.जामनेर शिवारात सोलर केबल चोरीचा धुमाकूळ; पाच शेतकरी बाधित-चोरट्यांचा बंदोबस्त करावा-शेतकऱ्यांची मागणी



वाकडी  प्रतिनिधी (ता. जामनेर), दि. २२ मे २०२६ :

दिशा लाईव्ह न्यूज ---:::----फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा केबल चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिला आहे. शेंगोळा शिवारात एका रात्रीत पाच शेतकऱ्यांच्या शेतातून सोलर व इलेक्ट्रिक केबल वायरची चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांपासून फत्तेपूर, टाकळी पिंप्री, लोणी, मादणी, पिंपळगाव-चौखांबे, तोरनाळा, देऊळगाव आणि वाकडी या गावांमध्ये केबल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता चोरट्यांचा मोर्चा शेंगोळा गावाकडे वळल्याचे दिसून येत आहे.

एका रात्रीत पाच शेतकऱ्यांचे नुकसान

दि. १५ मेच्या मध्यरात्री चोरट्यांनी शेंगोळा शिवारात प्रवेश करून वेगवेगळ्या शेतांमधून केबल वायर चोरी केली. त्यामध्ये –

समाधान जगन्नाथ मुळे (गट नं. १८३/१/२) यांच्या शेतातून २०० फूट सोलर केबल (₹२०००)

रामचंद्र ओंकार मुळे (गट नं. १८४) यांच्या शेतातून २०० फूट सोलर केबल (₹२०००)

श्रावण सुपडू सपकाळ (गट नं. १५४/२) यांच्या शेतातून ५० फूट वायर (₹६००)

शंकर शेनफड दहितकर (गट नं. १८३/३) यांच्या शेतातून २०० फूट केबल (₹२०००)

कृष्णा ओंकार मुळे (गट नं. १८४) यांच्या शेतातून २०० फूट केबल (₹२०००)

अशी एकूण ८५० फूट केबल वायर (₹८६०० किंमत) चोरट्यांनी लंपास केली आहे.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह?

या वाढत्या घटनांमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही चोरट्यांवर लगाम लावण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शेतीप्रधान भागात अशा प्रकारच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांच्या पिकांच्या व्यवस्थापनावरही परिणाम होत आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

कडक कारवाईची मागणी

परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री गस्त वाढवावी, चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments