दिशा लाईव्ह न्यूज--::----आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या आखाती युद्धाचे दूरगामी परिणाम आता ग्रामीण भागात तीव्रतेने जाणवू लागले असून लोहारा व पहूर परिसरात डिझेल-पेट्रोलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाच्या या अभावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांसह शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
दोन दिवसांपासून लोहारा व पहूर येथील पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच वाहनधारकांच्या रांगा लागण्यास सुरुवात होते. दुपारपर्यंत ही गर्दी प्रचंड वाढत असून राष्ट्रीय महामार्गावर काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शेंदूर्णी येथेही डिझेलचा तुटवडा असल्याने तेथील वाहनधारक लोहारा येथे गर्दी करत आहे.मिळेल तेथून शेतकरी व वाहन धारक डिझेल खरेदी करण्यासाठी धडपड करीत आहे.
चारचाकी, दुचाकी, ट्रॅक्टर, ऑटो, मालवाहू वाहनांचे चालक तासन्तास उन्हात उभे राहून आपल्या नंबरची वाट पाहत आहेत.
अनेक ठिकाणी नागरिकांनी प्लास्टिक कॅन, ड्रम, बाटल्या ठेवून आपली “रांग” राखून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी किरकोळ वादही झाल्याचे समोर आले आहे.
‘इंधन मिळेल की नाही’ – नागरिकांमध्ये भीती
इंधनाचा पुरवठा अनियमित असल्याने दिवसभरात कधी पंपावर इंधन संपेल याचा काही नेम नाही. त्यामुळे “आज इंधन मिळेल का?” या भीतीने नागरिक अधिकच घाबरले आहेत.
याचा थेट परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असून शाळा, नोकरी, व्यवसाय यावर परिणाम होत आहे.
शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
सध्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. अशा वेळी डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
ट्रॅक्टर, रोटाव्हेटर बंद पडले
विहिरींचे पंप सुरू करता येत नाहीत
फवारणी व मशागतीची कामे ठप्प
मजुरांवर अवलंबित्व वाढले
परिणामी, पेरणी उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली असून उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-वाहतूक व व्यवसायावर परिणाम
इंधन टंचाईचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून
मालवाहतूक ठप्प होत आहे.
किराणा व भाजीपाला पुरवठा विस्कळीत.
छोटे व्यावसायिक अडचणीत.
वेळेवर किराणा व इतर माल मिळेनासा.
प्रवासी वाहतूक अनियमित.
यामुळे स्थानिक अर्थचक्रावर परिणाम होत आहे.
नागरिक व शेतकऱ्यांचा संताप!
“आखाती युद्धाचा फटका आम्हाला का बसावा?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शेतकरी वर्गातून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना
स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी पुढील मागण्या केल्या आहेत :
नियमित व पुरेसा इंधन पुरवठा करावा.
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल कोटा द्यावा.
काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई करावी.
पेट्रोल पंपांवर शिस्तबद्ध रांग व्यवस्थापन करावे.
आखाती युद्धामुळे निर्माण झालेली ही इंधन टंचाई ग्रामीण भागासाठी गंभीर संकट ठरत आहे. तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवन यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे अत्यावश्यक बनले आहे.



Post a Comment
0 Comments