Type Here to Get Search Results !

महावितरणचे काम युद्धपातळीवर; लोहारा येथील कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी, खरे "खतरो के खिलाडी " ग्रामस्थांकडून कौतुक! काही तासात चालू केला वीजपुरवठा.



 दिशा लाईव्ह न्यूज --::--- लोहारा, ता.पाचोरा येथे अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी थैमान घातलेल्या परिस्थितीत लोहारा परिसरातील महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम करत अवघ्या काही तासांत वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या धाडसी, तत्पर आणि कर्तव्यदक्ष कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोमवार, १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. जवळपास पाऊण तास चाललेल्या या अवकाळी पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर वीजतारा तुटल्याने संपूर्ण भागातील वीजपुरवठा खंडित झाला.



या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. अंधाराचे साम्राज्य पसरले असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मध्यरात्रीपासूनच दुरुस्तीचे काम हाती घेतले. मुसळधार पाऊस, चिखल, अंधार आणि तुटलेल्या तारांचा धोका असूनही त्यांनी कोणतीही भीती न बाळगता काम सुरू ठेवले.

सहाय्यक अभियंता निसार तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ हरीश ठाकरे, वरिष्ठ तंत्रज्ञ हितेश गोराडे, विजय चव्हाण आणि मच्छिंद्र कोळी यांनी अथक परिश्रम घेतले. 

सततच्या प्रयत्नांनंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत खंडित वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात आला.



या धाडसी कामगिरीमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला प्राधान्य देत जनतेची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे काम प्रेरणादायी असून, त्यांचा आदर्श इतरांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.

“संकटाच्या वेळी धावून येणारे खरे खतरो के खिलाडी असली  हिरो म्हणजे महावितरणचे कर्मचारीच,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.



Post a Comment

0 Comments