Type Here to Get Search Results !

लोहारा येथे अंगणात उभी दुचाकी गाडी पेटवली; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! पोलिसांसमोर आरोपीचे आव्हान.आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी-ग्रामस्थांची मागणी.


दिशा लाईव्ह न्यूज---:- लोहारा ता. पाचोरा येथील पालिवाल गल्ली परिसरात अज्ञात व्यक्तीकडून अंगणात उभी असलेली दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी आरोपीचा त्वरित शोध घेण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालिवाल गल्लीतील रहिवासी  तरुण रोहन उमेश पालिवाल यांची सुमारे दीड लाख रुपये किमतीची दुचाकी (एमएच-१९/ईसी-९०४) ही घराच्या अंगणात उभी करण्यात आली होती. दरम्यान, ६ जून रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुचाकी अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली.



घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, ही घटना केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “हा समाजकंटक कोण? त्याचा कोणाशी वैर आहे?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ग्रामस्थांनी पुढे इशारा देत म्हटले आहे की, जर वेळेत आरोपीचा शोध लागला नाही, तर तो पुन्हा अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करू शकतो. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जलदगतीने तपास करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या पोलिसांच्या भूमिकेकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments