पाचोरा -प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज--::---जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करत भारतीय सैन्य दलातील एका जवानाकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने निलेश उभाळे यांच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जवान आणि संशयित निलेश उभाळे यांच्यात यापूर्वी जमीन व्यवहारासंदर्भात संपर्क होता. संबंधित व्यवहारात आपण मध्यस्थी केली असल्याचा दावा करून उभाळे यांनी फिर्यादीकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीला वारंवार मोबाईलवर संपर्क करून शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, या संभाषणांचे ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) त्यांच्याकडे उपलब्ध असून ते पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहे. या ध्वनिमुद्रणांच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, आरोपीने केवळ फिर्यादीलाच नव्हे तर त्यांच्या वृद्ध वडिलांनाही पैशांसाठी त्रास देत धमक्या दिल्या. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून घरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(५), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.
दरम्यान, निलेश उभाळे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी केल्यामुळे काही जण आपल्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्यावरील आरोप खोटे व निराधार असून निष्पक्ष तपासातून सत्य समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment
0 Comments