Type Here to Get Search Results !

जामनेरात २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू मारहाण करून फरफटत नेल्याचा नातेवाईकांचा संशय; पोलिसांकडून तपास सुरू



 दिशा लाईव्ह न्यूज --::--जामनेर शहरातील शास्त्रीनगर परिसरातील २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी घडली. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांमुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बबलू वाणी यांना जखमी अवस्थेत रिक्षातून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. बबलू वाणी यांच्या पायावर तसेच शरीराच्या उजव्या बाजूस फरफटत नेल्यासारख्या जखमा आढळून आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना मारहाण झाली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

रुग्णालयात घेऊन येणारे अज्ञात व्यक्ती कोण?

जखमी अवस्थेतील बबलू वाणी यांना रुग्णालयात घेऊन आलेले व्यक्ती कोण होते, त्यांच्याकडे असलेली रिक्षा कोणाची होती, तसेच बबलू यांना नेमके कुठून आणि कोणत्या परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींचा तपास करून घटनेमागील सत्य समोर आणावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बबलू वाणी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक व संशयास्पद मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, या घटनेमागील नेमके सत्य पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments