Type Here to Get Search Results !

सहा महिन्यांतच शिवरायांच्या पुतळ्याला तडे? शेंदुर्णीच्या कोट्यवधींच्या शिवसृष्टी स्मारकाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह? तर...शेंदूर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे गेलेले नाहीत; नगरपंचायत व मूर्तिकारांचा अधिकृत खुलासा.


राहुल चौधरी,शेंदुर्णी .

दिशा लाईव्ह न्यूज :--: शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीतच भेगा पडल्याचे तसेच पृष्ठभागावरील रंग उडून पांढरे डाग व नुकसान झाल्याचे छायाचित्रांमधून प्रथमदर्शनी दिसून येत आहे.



पुतळ्याच्या विविध भागांचे घेतलेले छायाचित्र पाहता काही ठिकाणी तडे गेलेले, पृष्ठभागाला भेगा पडलेल्या, रंग निघालेला आणि पांढऱ्या रंगाचे डाग दिसून येत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या निधीतून उभारलेल्या स्मारकाच्या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, रंगकाम आणि पुतळ्याची गुणवत्ता याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, संबंधित कॉन्ट्रॅक्टरने पुतळ्याच्या दर्जाबाबत “पाच हजार वर्षे देखील पुतळ्याला काही होणार नाही,” असा दावा केल्याचे सांगण्यात येते. मात्र पुतळ्याची सद्यस्थिती पाहता या दाव्याची चर्चा आता शेंदुर्णीत रंगली आहे. पाच हजार वर्षांची हमी सांगणाऱ्या पुतळ्यावर सहा महिन्यांतच तडे आणि रंगाची झीज कशी झाली? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

            ठेकेदाराला जाब विचारत प्रश्नांचा भडिमार

या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी संबंधित ठेकेदाराला विविध प्रश्न विचारून जाब विचारला. कामाचा दर्जा काय होता? कोणते साहित्य वापरण्यात आले? पुतळ्याला कोणत्या प्रकारचा रंग देण्यात आला? कामाची गुणवत्ता तपासणी कोणी केली? तसेच भविष्यात पुन्हा नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

नागरिकांच्या प्रश्नांमुळे संबंधित ठेकेदाराला स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानंतर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी पुतळ्याच्या झालेल्या नुकसानीची दुरुस्ती व रंगरंगोटी संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.



तसेच भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची योग्य काळजी घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचे समजते.

          शिवरायांचा पुतळा म्हणजे केवळ बांधकाम नव्हे!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शेंदुर्णीकरांच्या भावनेशी आणि अस्मितेशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामात दर्जाबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, अशी भावना शिवप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

नगरपंचायतीने केवळ रंगरंगोटी करून विषय संपवण्याऐवजी पुतळ्याची तांत्रिक तपासणी करून कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, ठेकेदाराची हमी व देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी याबाबत पारदर्शक माहिती नागरिकांसमोर ठेवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

“पाच हजार वर्षांची वॉरंटी” सांगितलेल्या पुतळ्याची सहा महिन्यांत झालेली अवस्था नेमकी का झाली? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून मिळणे गरजेचे आहे. 

**********************************************

शेंदूर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे गेलेले नाहीत; नगरपंचायत व मूर्तिकारांचा अधिकृत खुलासा!



शेंदूर्णी येथील नगरपंचायतीच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राँझ धातूच्या अश्वारूढ पुतळ्याला तडे गेलेले नसून तो सुरक्षित असल्याचा अधिकृत खुलासा नगरपंचायत प्रशासन व मूर्तिकारांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

​शेंदूर्णी येथील शिवस्मारकातील पुतळ्याला तडे गेल्याची शंका काही स्थानिक नागरिक व शिवप्रेमींनी उपस्थित केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपंचायतीने २ सप्टेंबर २०२६ रोजी मूर्तिकार 'गर्ग आर्ट स्टुडिओ'ला नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर मूर्तिकार मिलिंद गर्ग यांनी शेंदूर्णी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद बारी, मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या उपस्थितीत त्यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या.

​             मूर्तिकारांनी दिलेला तांत्रिक खुलासा:

​तडे गेलेले नाहीत: पुतळ्याला कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नाहीत.

​पांढरी पावडर म्हणजे वेल्डिंग फ्लक्स: पुतळ्याच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणारी पांढऱ्या रंगाची पावडर ही 'वेल्डिंग फ्लक्स' (Welding Flux) आहे. ब्राँझ धातूचा पुतळा बसवल्यानंतर पहिल्या एका वर्षात वातावरणातील बदलांमुळे ही प्रक्रिया होणे पूर्णपणे स्वाभाविक आणि तांत्रिकदृष्ट्या सामान्य आहे.

​जानेवारीत पॉलिशिंग: पावसाळा संपून कडक ऊन पडल्यानंतर, म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण पुतळ्याचे रंगकाम (पॉलिशिंग) नव्याने करून दिले जाईल.

​समस्या कायमस्वरूपी मिटणार: जानेवारीतील पॉलिशिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात असा प्रकार पुन्हा उद्भवणार नाही, अशी लेखी हमी मूर्तिकारांनी दिली.

​पत्रकार परिषदेनंतर उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार आणि शिवप्रेमींनी प्रत्यक्ष स्मारकाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी मूर्तिकारांनी वेल्डिंग फ्लक्सची पावडर प्रात्यक्षिकासह दाखवून सर्वांच्या शंकांचे निरसन केले.

​                         प्रशासनाची भूमिका:

नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी मूर्तिकारांचे स्पष्टीकरण नोंदवून घेत, जानेवारी महिन्यात पुतळ्याचे काम अत्यंत सुस्थितीत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. काम योग्य रीतीने न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला असून, मूर्तिकारांकडून यासंदर्भात लेखी खुलासा घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत कोणताही गैरसमज न बाळगता नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments