दिशा लाईव्ह न्यूज :-: तेली समाज पंच मंडळ, जामनेर यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. हिवरखेडा रोडवरील श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीष महाजन, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत अण्णा बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. जितेंद्र काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विजय भाऊ चौधरी होते.
यावेळी जळगाव येथून महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रय चौधरी, सचिव श्री. अनिल पाटील सर, तसेच जामनेर तालुक्यातील विविध गावांचे समाजाध्यक्ष आणि जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच कला, क्रीडा तसेच विविध शासकीय सेवांमध्ये नियुक्ती मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या समाजबांधवांचाही विशेष गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाचा गौरव होत असल्याने उपस्थित पालक आणि समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गुणवंतांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरावा, असा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन
गुणगौरव सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. कोमल नाना चौधरी, सहाय्यक प्राध्यापिका, शासकीय दंत महाविद्यालय, जळगाव तसेच डॉ. प्रथमेश निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम आणि भविष्यातील करिअर निवडताना आवश्यक असलेले नियोजन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअरची दिशा ठरविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
समाज संघटनावर भर
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजय भाऊ चौधरी यांनी समाजबांधवांशी संवाद साधताना समाजातील एकोपा, संघटन आणि सामाजिक विकासाच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाजबांधवांना एकत्र आणून सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, त्यांना योग्य वेळी करिअर मार्गदर्शन आणि समाजातील गुणवत्तेला प्रोत्साहन देणे ही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची बाब असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पदाधिकाऱ्यांचे परिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश पाटील सर यांनी केले, तर श्री. विक्रम चौधरी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाज पंच मंडळ जामनेरचे अध्यक्ष श्री. सोपान चौधरी, उपाध्यक्ष श्री. निखिल भोलाने, सचिव श्री. रामेश्वर पाटील, श्री. सुरेश तेली सर, श्री. पप्पू चौधरी, श्री. मुकेश चौधरी, श्री. किरण चौधरी यांच्यासह तेली समाज पंच मंडळाचे पदाधिकारी व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान समाजबांधवांचा गौरव करत आयोजित करण्यात आलेला हा सोहळा समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरला.


Post a Comment
0 Comments