Type Here to Get Search Results !

एकुलती येथे विवाहितेची आत्महत्या सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी; बारा तासांनंतर मृतदेह बाहेर


पहूर प्रतिनिधी--ता. जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज :--: सासरच्या जाचाला कंटाळून ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरामागील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना एकुलती (ता. जामनेर) येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. जिजाबाई देवानंद सकट असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून जिजाबाई सकट यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेतली. विहिरीत पाणी असल्याने त्यांचा मृतदेह तातडीने बाहेर काढणे शक्य झाले नाही. विहिरीतील पाणी पंपाच्या साहाय्याने उपसल्यानंतर तब्बल बारा तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, मयत जिजाबाई यांच्या आई इंदुबाई रघुनाथ चंदनशिव (रा. ढालसिंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती देवानंद युवराज सकट व सासरा युवराज सुखदेव सकट यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मृतदेहाचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे करीत आहेत.

मयत जिजाबाई यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आईचे छत्र हरपल्याने दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने एकुलतीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments